मंगलवार, जनवरी 31, 2006

नेहमी प्रमाणे या वर्षाच्या नाटय व साहित्य संमेलनांमध्ये बेळगाव संदर्भात ठराव पारित करण्यात आले. यंदाच्या नाटय संमेलनाध्यक्षांनी एक पाऊल पुढे जाऊन श्री. गिरीश कर्नाड व कन्नड साहित्यिक श्री. भैरप्पा यांना त्यांच्या मौनाबद्दल जाब विचारला. परंतु सर्व मान्यवर रंगकर्मी व साहित्यिकांना मला नम्रपणे असे विचारावेसे वाटते की खरंतर हा प्रश्न त्यांनी स्वत:स विचारावयास हवा.

बेळगाव महानगरपालिकेने जेंव्हा महाराष्ट्रात सामील होण्याचा ठराव संमत केला, तेंव्हा कर्नाटकातील साहित्य व कलाक्षेत्रातील मान्यवरांनी रस्त्यावर उतरुन त्याचा जोरदार निषेध केला. एवढेच नव्हे तर महापौर विजय मोरेंवर भ्याड हल्ला करणार्‍या कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांना निर्दोष सोडण्यात यावे म्हणून निदर्शनेही केली. याऊलट महाराष्ट्रातील साहित्यिकांनी काय केले तर निषेधाची पत्रके काढली. कधी काळी याच महाराष्ट्रातील लेखणीने पृथ्वीचे प्रेमगीत लिहिले आणि क्रांतीचा जयजयकारही केला. ज्या लेखणीने श्रृंगारिक गझला लिहिल्या त्याच लेखणीने आयुष्याच्या मशाली पेटविणारा अंगारही चेतविला.

संमेलनाच्या नावाने भरणार्‍या जत्रेला नित्यनेमाने हजेरी लावणार्‍यांना किमान एक दिवस हुतात्मा चौकात एकत्र येता आलं नाही. राजकीय नेत्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. केवळ चॅनल्स् व वृत्तपत्रांमधून रोखठोक इशारे द्यायचे आणि दुसर्‍या दिवशी सर्व विसरुन जायचे. तथाकथित राजकीय अपरिहार्यता आणि अगतिकतेने तर आमच्या मराठी पुढार्‍यांना नेहमीच घेरलेले असते. प्रादेशिक अस्मितेच्या प्रश्नांवर पक्षभेद विसरुन एकत्र येणारे दक्षिणेचे नेते कुठे आणि हायकमांड कडून दबाव आल्यावर गप्प बसणारे आमचे नेते कुठे.

राजकाण्यांच्या या अशा वागण्याची तर मराठी जनतेला आता सवयच झाली आहे. परंतु एकेकाळी केवळ साजिकच नव्हे तर राजकीय चळवळींचेही नेतृत्व केलेल्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राकडून मराठी समाजाला अजूनही खूप अपेक्षा आहेत.
आज पासून मी तुमच्याशी या ब्लॉगद्वारे संवाद साधणार आहे. हा संवाद अगदी मनमोकळा असेल. विषयाचं तसं काही बंधन नाही. परंतु आपल्या रोजच्याच जीवनात घडणार्‍या घटनांविषयीच या गप्पा असतील. घटना ज्या तुंम्हा आम्हाला अस्वस्थ करतात आणि कधी कधी आनंदही देतात अशा काही घटनांवर मी तुमच्याशी संवाद साधणार आहे.

तसे आपले प्रत्येकाचे वेगवेगळया विषयांवर काही ना काही मत असतं आणि कुणीतरी ते ऐकावं, वाचावं, त्यावर आपलं मत मांडावं अशी सूप्त इच्छा सुध्दा असते. परंतु अनेकदा भीती, दडपण किंवा लाजेखातर आणि बरेचदा नेमकं माध्यम न सापडल्याने आपण आपले विचार मांडत नाही. परंतु ब्लॉगच्या रूपाने विचारांचे आदान प्रदान करण्याचं एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. माझ्या या विचारांवर तुमच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
असो, मला वाटतं आजच्यासाठी एवढं पुरेसं आहे. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह...